⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तब्बल ६ महिने होती ‘प्रति पंढरपूर’ची आरास, बैलगाड्या भरून आले होते भाविक, विद्यार्थ्यांच्या सहली

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी आणि खेडोपाडी देखील गणरायाचे जल्लोषात आगमन होऊ लागले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जळगावात साकारण्यात आलेली एका आरास तब्बल सहा महिने ठेवण्यात आली होती. ‘प्रति पंढरपूर’ची आरास पाहण्यासाठी गावागावातून भाविक बैलगाडीने जळगावात येत होते. इतकंच नव्हे तर वाहनाने विद्यार्थ्यांच्या सहली आणि पायी वारी देखील येत होत्या. शहरच नव्हे तर देशात हा पहिलाच प्रकार असावा असा अंदाज जुने जाणते लोक व्यक्त करतात.

जळगाव शहरातील गणेशोत्सवाने राज्याला बरेच काही दिले आहे. आज आपण पाहत असलेल्या गणेशोत्सवापेक्षा स्वातंत्र्यानंतर शहरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कितीतरी अधिक भव्यदिव्य होते. आज अनेक ठिकाणी साकारली जाणारी आरास सर्वांनी आकर्षित करीत असताना ज्या काळात तंत्रज्ञान फारसे नव्हते तेव्हा जळगावात साईनाथ मित्रमंडळाने रौप्य महोत्सवानिमित्त साकारलेली प्रति पंढरपूरची आरास फार चर्चेची ठरली होती.

अनेक आकर्षक आरास साकारल्या

शहरात सुरु झालेल्या काही सार्वजनिक मंडळापैकी साईनाथ मित्र मंडळ हे एक जुने मंडळ होते. विश्वनाथ यादवशेठ दापोरेकर यांच्या प्रेरणेने या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. सराफ बाजार परिसरात मंडळ सुरु करण्यात आल्यानंतर मुकुंदा दापोरेकर, तुळशीदास दापोरेकर, सुरेशशेठ कासार, देविचंद हिरालाल जैन यांचा मंडळात नेहमी पुढाकार राहत होता. मंडळाने सराफ बाजार परिसरात त्याकाळी सत्यवान सावित्री, सुवर्ण तुला, छत्रपती शिवाजी दरबार, श्रीकृष्ण जन्म, रास लीला, कृष्ण रंग पंचमी, संतोषी माता, गणेश मंदिर, दत्त अवतार, महायज्ञ, संत जनाबाई, साईबाबा समाधी, सागरी सेतू अशा कितीतरी आकर्षक आरास साकारल्या होत्या.

मंडळाच्या स्टेज खाली घालवावे लागत होते ४ तास

जळगावात साईनाथ मित्र मंडळाने साकारलेल्या आराससाठी नाशिक येथील रमेश आर्टची साथ लाभत होती. चलचित्र आणि हलत्या कलाकृतींची आरास साकारण्यात रमेश आर्टचा हातखंडा होता. साईनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी आरास यशस्वी करण्यासाठी स्टेजच्या खाली मशीन आणि पट्ट्यांवर देखरेख करण्यासाठी ४-४ तास थांबून राहत होते. खाली गरम होत असले तरी आरास खंडित होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते.

 

गोलाणी नव्हे कॉटन मार्केटच्या जागेवर होती आरास

आज गोलाणी मार्केट असलेल्या ठिकाणी १९८० च्या दशकात कॉटन मार्केट होते. परिसरातील सर्व कापसाची बोली आणि व्यापार त्याठिकाणी केला जात होता. जुन्या शहरापासून लांब मात्र गावाच्या लगतच असलेल्या या जागेवर साईनाथ मित्र मंडळाने ‘प्रति पंढरपूर’ची आरास साकारली होती. साईनाथ मित्र मंडळाचे तेव्हा रौप्य महोत्सवी वर्ष होते. मुंबई, पुणेच्या धर्तीवर रौप्य महोत्सवी वर्षात काहीतरी भव्य दिव्या करण्याच्या हेतूने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विचार विनिमय केला. शिर्डी साईबाबा मंदिर, शेगाव किंवा पंढरपूर साकारण्यावर चर्चा होत होती. विठ्ठलाचे भक्त आणि ग्रामीण भागातील वारकरी मंडळींच्या श्रद्धेचा विषय असल्याने प्रति पंढरपूर साकारण्याचा निर्णय झाला. भव्य आरास सराफ बाजार परिसर साकारणे शक्य होणार नसल्याने कॉटन मार्केटची जागा निश्चित करण्यात आली होती.

२ ट्रक बांबू, प्रशासनाचा विरोध, हुबेहूब विठ्ठलाची मूर्ती

आरास साकारण्यासाठी सुरुवातीला पैशांची चणचण होती. मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत देणगी जमा केली. अनेकांनी तर साहित्य मोफत देऊ केले. प्रति पंढरपूरची आरास साकारताना संत नामदेवच्या पायरीपासून ते विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत सर्व जशेच्या तसे साकारण्याचा निर्धार मंडळाने केला होता. आराससाठी २ ट्रक बांबू, सेंट्रिंग प्लेट, सुतळी, दोर असे कितीतरी साहित्य वापरण्यात आले होते. संपूर्ण आरास तयार झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मंडळाला परवानगी नाकारली. मंडळाचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले. अखेर शासकीय यंत्रणेने त्यांच्या अभियंत्यामार्फत मंडळाची मजबुती तपासली. लहानशी त्रुटी काढली. मंडळाने दुरुस्ती केल्यानंतर मंडळ स्थापना झाली. रमेश आर्टने विठ्ठलाची हुबेहूब मूर्ती जळगावात तयार केली. तीच उंची आणि रेखीव काम त्यांनी केले.

सहा महिने आरास, वारकऱ्यांची गर्दी, विद्यार्थ्यांच्या सहली 

प्रति पंढरपूरची अतिशय आकर्षक असलेली आरास पाहण्यासाठी आजूबाजूचे भाविक गर्दी करू लागेल. गणेशोत्सवाच्या १० दिवसात दिवसभर भाविकांची गर्दी होत होती. गणरायाला निरोप देण्याचा दिवस आला तरीही गर्दी कमी होत नसल्याने आरास कायम ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. भुसावळ, बोरनार, पाचोरा, ममुराबाद, नशिराबादसह जळगावच्या आजूबाजूला असलेल्या खेड्याडून भाविक बैलगाडी भरून आरास पाहण्यासाठी येत होते. विविध शालेय सहली, वारकऱ्यांच्या पालख्या आरास पाहण्यासाठी येत होत्या. गणेशोत्सवात सुरु झालेली आरास तब्बल ६ महिने ठेवण्यात आली होती. भाविकांकडून दररोज २-३ लोटगाडी भरून केळीचा प्रसाद दिला जात होता. जळगावातीलच नव्हे तर बहुदा हा देशातील पहिलाच प्रकार असावा, असे जेष्ठ जाणकार सांगतात.

विठ्ठलाची मूर्ती आजही मंदिरात स्थापन
प्रति पंढरपूर साकारताना त्याठिकाणी ठेवलेली विठ्ठलाची मूर्ती अतिशय रेखीव आणि बोलकी होती. भाविकांची गर्दी ओसरल्यावर ६ महिन्यांनी आरास हटविण्यात आली. आरास हटविल्यानंतर त्याठिकाणी असलेली विठ्ठलाची मूर्ती सराफ बाजारात मंडळाच्या मूळ जागेवर लहानसे मंदिर उभारून त्यात स्थापना करण्यात आली. सराफ बाजारात ये-जा करणारे भाविक नेहमी त्या ठिकाणी दर्शन घेत होते. काही वर्षांपूर्वी ते मंदिर त्याठिकाणाहून हटविण्यात आले आणि साईनाथ मंडळाचे प्रमुख श्री.दापोरेकर यांनी ती मूर्ती आपल्या दापोरेकर मंगल कार्यालयात लहानसे मंदिर बांधून स्थापना केली आहे. आजही मूर्ती त्या मंदिरात असून नियमितपणे विधिवत पूजा अर्चा देखील करण्यात येते. मंडळाच्या प्रति पंढरपूर आरासची दखल त्या काळात प्रादेशिक वाहिन्यांनी देखील घेतली होती.