जळगाव लाईव्ह न्यूज | २३ डिसेंबर २०२२ | जळगाव जिल्ह्यात गोळीबार आणि गावठी कट्टे तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. जळगाव मध्ये गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना नाही. शहरासह जिल्ह्यात गावठी कट्ट्यांमधून गोळीबार होणे आणि गावठी कट्टे पकडले जाण्याचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतुसांसह जवळपास ३८ लाखांचा ऐवज जप्त केला होता. त्याआधी भुसावळ शहरात दोघांना दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसांसह बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. अशी कितीतरी प्रकरणे पोलिस दप्तरी नोंद आहेत आणि त्यापेक्षा जास्त घटनांची नोंदही नाही. मात्र जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना का वाढत आहेत आणि गोळीबार करण्यासाठी कट्टे कुठून येत आहेत? याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
उमरटी गावानजीक गावठी कट्टे बनविण्याचे अड्डे
मागील काही वर्षांपासून जळगाव शहर व जिल्ह्यात गावठी कट्टे अगदीच सहज उपलब्ध होत आहेत. वाळू तस्करी, अवैध धंदे आणि दहशत माजविण्यासाठी या कट्ट्यांचा वापर केला जातो. जळगाव जिल्ह्यात गुटखा, गांजानंतर आता गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट होवू पाहत आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातील तरूणांमध्ये गावठी कट्ट्याचे फॅड वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने सातपुडा परिसरात अवैधरित्या गावठी कट्टे विक्री होते, हे आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मध्यप्रदेशातील उमरटी येथून मोठ्याप्रमाणात जळगावात शस्त्रे विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची सीमा ठरवणार्या अनेर नदीच्या मध्यप्रदेश कडील तीरावर उमरटी हे गाव गावठी कट्टे बनवण्याच्या बाबतीत कुख्यात झाले आहे.
चोपडा तालुक्यापासून दीड तासांच्या अंतरावर
उमरठी हे गाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यापासून दीड तासांच्या अंतरावर आहे. डोंगरदर्यांमध्ये वसलेल्या आणि अवघी शे-दोनशे घरे असलेल्या या गावापर्यंत जाऊन सर्वच गावठी कट्ट्यांचा तपास थांबतो. उमरठी गावाच्या आजुबाजूला असलेल्या घनदाट जंगलात गावठी कट्टे तयार होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. उमरठी गावातून चोपडा, अमळनेर किंवा सेंधवा भागातून शहाद्यापर्यंत हे कट्टे पोहचतात. तेथून काही तस्करांच्या माध्यमातून गावठी कट्टे धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगरपर्यंत येतात. या ठिकाणाहून तस्कर चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येतात. त्यानंतर जिल्हानिहाय शस्त्र तस्करी केली जाते.
मध्यप्रदेशातील पोलिसांची भुमिका संशयास्पद
मध्यप्रदेशासह उत्तर प्रदेशातूनही जिल्ह्यात गावठी कट्टे येतात. यामध्ये खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट सक्रीय आहे. पोलिसांनी गावठी कट्टे पकडले असले तरी जिल्ह्यात येणार्या कट्ट्यांची साखळी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. गावठी कट्टे जिल्ह्यात येताना सीमेवर फारसा अडथळा येत नाही. जिल्ह्यात या गावठी कट्ट्यांची विक्री साखळी पद्धतीने केली जाते. यामध्ये गुन्हेगारी वृत्तीचे तरूण सक्रीय असल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील पोलीस गावठी कट्टे घेऊन जाणार्यांना सातत्याने सापळा रचून पडत असतात; परंतु मध्यप्रदेशमध्ये सर्रासपणे गावठी पिस्तूल तयार होऊन विक्री होत असेपर्यंत येथील पोलिसांच्या ही घटना लक्षात येत नसावी, हे न पटणारे आहे. म्हणून महाराष्ट्र पोलीस आणि मध्यप्रदेश पोलीस यांनी हे अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी संयुक्त मोहिम राबविण्याची गरज आहे.