जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरासरी दिवसाला एक दुचाकी चोरीला जाते. मार्च महिन्यात १८ ते २४ मार्च या सहा दिवसात शहराच्या विविध भागातून चोरीला गेलेल्या चार दुचाकी स्थानिक गुन्हा शाखेने हस्तगत केल्या. यातील तीन दुचाकी शहर तर एक दुचाकी जिल्हापेठ हद्दीतून लंपास झाली आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना बुधवारी तालुक्यातील वसंतवाडी येथील एकाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अक्रम शेख आदींचे पथक नेमले. त्यांनी वसंतवाडी येथे जाऊन विक्रम भिका चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याने चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या. दरम्यान, त्याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तो नव्याने या चोरीच्या क्षेत्रात आला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. संशयित चोरट्याला अटक करून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तपास हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करीत आहे.
या चार दुचाकी ताब्यात
१८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता मनपाजवळून सचिन फकिरा न्हावी (रा. जिजामातानगर) यांची हिरो होंडा स्प्लेंडर एमएच १९ डीयु ८२३५ ही चोरीला गेली होती. १९ रोजी दुपारी २ वाजता निलेश रविंद्र खडके (रा. विठ्ठलपेठ) यांची स्प्लेंडर एमएच १९ बीबी ६५०० ही गोलाणीतून चोरीला गेली होती. २१ मार्च रोजी रात्री ९ वाजता शेख उस्मान शेख नसीम (रा. तोंडापुर, ता. जामनेर) यांची नायक हॉस्पिटल येथून होंडा शाईन एमएच २० एफक्यु ९७२८ ही लंपास झाली होती. तर २४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता चेतन सेवकराम बोरोले (रा. न्हावी) यांची होंडा शाइन एमएच १९ ईसी ३९६८ ही दाणा बाजारातून चोरीला गेली होती.