जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । शिवसेनेचे (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यांनतर बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध बंड पुकारला होता. त्यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिला होता. परिणामी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे.