जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात उतरलेल्या बंडखोरांवर शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरेंनी बंडखोरी मागे घेण्यास आपल्या नेत्यांना सांगितले. पण बंडोबा आपल्या निर्णायावर कायम राहिले, त्यामुळे ठाकरेंनी कठोर कारवाई करत पाच जणांना पक्षातून निलंबित केलेय.
तिकीट नाकारल्यामुळे आपल्याच पक्षाच्या विरोधात उतरलेल्या बंडखोरांवर ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे ठाकरेंनी कारवाई केली. भिवंडी पूर्वचे रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी आणि प्रसाद ठाकरे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव शहर मतदार संघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी दिली आहे. परंतु ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. काल सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर कुलभूषण पाटील यांच्या माघारीसाठी मुंबईहुन संपर्कप्रमुख उपनेते संजय सावंत जळगावात आले होते. परंतु समजूत काढून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. कुलभूषण पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज माघे न घेतल्यामुळे आता ठाकरे गटाकडून काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे.