⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

चिनावलच्या शेतकऱ्यांचे केळी खोड कापून फेकले, ४ लाखांचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रावेर तालुक्यातील चिनावल येथील दोन शेतकऱ्यांचे एक हजारापेक्षा जास्त केळी घड कापून फेकून ४ लाखांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निखिल कमलाकर भारंबे व कमलाकर नारायण भारंबे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव असून याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी गावातील पोलिस चौकीत आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. ही स्थिती पाहता गावात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.

याबाबत असे की, बुधवारी सकाळी भारंबे यांचे एक हजारापेक्षा जास्त केळी घड कापून फेकल्याचे उघड झाल्याने शेतकऱ्यांचा पारा चढला. त्यांनी गावात आलेले डीवायएसपी लवांड, सावद्याचे एपीआय इंगोले यांना घेराव घालून शेतमालाची चोरी, नुकसान व शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्यांच्या अटकेची मागणी केली. या प्रकरणाला आळा न घातल्यास उद्रेक होईल असा इशारा दिला. काही शेतकऱ्यांनी पोलिस ठाणे, फैजपूर प्रांत कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची भूमिका घेतली. दरम्यान, केळी घड कापणाऱ्या अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

शेतकऱ्यांची घेतली बैठक
चिनावल येथील शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता डीवायएसपी विवेक लावंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक समाधान गायकवाड राजेंद्र पवार यांनी गावात बंदोबस्त वाढवला. दंगा नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या. मराठी शाळेत शेतकऱ्यांची बैठक घेत कारवाईचे आश्वासन दिले. श्रीकांत सरोदे, कमलाकर भारंबे, तुषार महाजन, गोपाळ नेमाडे, चंद्रकांत भंगाळे, योगेश बोरोले, कुंदन पाटील यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासबद्दल माहिती दिली

मंडळाधिकाऱ्यांकडून पंचनामा, अहवाल
महसूल विभागाचे मडळाधिकारी जे.डी.भगाळे, तलाठी लिना राणे यांनी नुकसानीचा पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवला. चिनावल पीक संरक्षण संस्थेतर्फे दोषींवर कारवाईचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, १९ फेब्रुवारीला शेतकरी मारहाण प्रकरणात संशयित रामा शामराव सपकाळे, प्रकाश शामराव सपकाळे, अनिता रामा सपकाळे यांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :