जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात भर उन्हात काम करत असताना उष्माघाताचा तीव्र फटका बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. प्रतापराव दत्तू पाटील (वय ४९) असं मयत शेतकऱ्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापराव पाटील हे रविवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. या वेळेस उन्हाची तीव्रता खूप जास्त होती. कडक उन्हात काम करत असतानाच त्यांना अचानक उष्माघातामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हा झटका इतका भीषण होता की, त्यांचा शेतातच जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर प्रतापराव पाटील यांचे पार्थिव तातडीने धुळे येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात त्यांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी अद्यापही तापमानाचा पारा ४० अंशांवर स्थिरावला आहे. त्यातच आद्रता वाढल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आहे.











