जळगाव पालिकेच्या पार्किंगमधून गाडी लांबविणारा सराईत जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

ऑगस्ट 6, 2026 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. विभोर जुलाल जाधव (मूळ रा. एरंडोल, सध्या राहणार विवरे खुर्द, ता. रावेर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची चोरीची हिरो डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे इतर वाहनचोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

New Project 1

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या गुन्ह्यांचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अद्याप उघडकीस न आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा लवकरात लवकर छडा लावून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याचे सक्त निर्देश दिले होते.

या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी एक विशेष पथक तयार करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता. या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत आरोपी विभोर जाधव याच्याकडे एक संशयास्पद हिरो डिलक्स मोटारसायकल (क्र. MH-19-BT-9433) आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ विवरे खुर्द येथे छापा टाकून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून सखोल चौकशी केली असता, त्याने सदर मोटारसायकल जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीच वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एकूण ३०,००० रुपये किंमतीची लाल-काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ नंदलाल पाटील करीत असून, आरोपीचे इतर गुन्ह्यांमध्येही हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पोलीस उप-निरी/सोपान गोरे, पोहेकों/लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील, पोकों/ जितेंद्र पाटील, पोकॉ/भुषण पाटील, पोकों/राहुल महाजन यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now