जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । इलेट्रीक बाईकसाठी आता परिवहन विभागाची मान्यता घेणे गरजेचे असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे अपघात वाढत आहेत. यामुळे आता परिवहन विभागाने हा निर्णय घातला आहे. या ई-बाईक जर राज्य परिवहन विभागाच्या मान्यता नसलेल्या विक्रेत्याकडून खरेदी केली तर उत्पादक, डीलर आणि चालकांवरदेखील मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल होणार आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन नोंदणी करण्यापासून बॅटरीवर चालणार्या आणि कमी सीसी क्षमतेच्या इलेट्रीक बाईकला सूट देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत काही महाशय बॅटरीची क्षमता 250 वॅटपेक्षा जास्त वाढवतात. वाहनाची वेगमर्यादा प्रति तास 25 कि.मी.पेक्षा जादा करतात. त्यामुळे रस्ता सुरक्षितेस धोका निर्माण होत आहे. आता परिवहन विभागाने आरटीओना नवे आदेश जारी केले आहेत.

चालक असाल तर सावधान
उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहनाच्या मॉडेलची चाचणी ही केंद्रिय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम126 मध्ये नमूद केलेल्या संस्थांकडून करायला हवी असे बंधन आहे. हे वाहन विक्री करण्यापूर्वी वाहन वितरक आणि उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा ‘टाईप अॅप्रुव्हल टेस्ट रिपोर्ट’ आणि परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी चालकावरच टाकण्यात आली आहे. सरकारने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021लागू केले आहे. ई-बाईक्स आणि ई-वाहनांना मोटार वाहन करातून 100 टक्के सूट दिली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 66,482 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.











