जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२५ । पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सात जणांना अटक झाली. विशेष यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्राजंल खेवलकर यांना देखील अटक झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान या प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.

एकनाथ खडसे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, अमली पदार्थ एका मुलीच्या पर्समध्ये सापडला आहे आणि तो कसा आला हे तिला पण माहिती नाही. तिला आरोपी नंबर एक बनवले पाहिजे होते आणि इतरांना साक्षीदार पण तसे झाले नाही. प्रांजल खेवलकरांकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही. विनाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे. यांना कसे बदनाम करायचे आणि यांचे तोंड कसे बंद करायचे, यासाठी हे सुरू आहे

माझ्या जावयाने मला सांगितले की, माझी पाळत ठेवली जात होती. सिव्हिल कपड्यांमध्ये पोलिस पाळत ठेवत असल्याचाही गंभीर आरोप खडसे यांनी म्हटले. कशापद्धतीनेही खडसे बदनाम झाले पाहिजे, यासाठी प्लॅन केला गेला. पोलिसांनी पाळत ठेवत असल्याचा व्हिडीओ आहे. पोलिसांबद्दल माझ्या मनात काही प्रश्न आहेत. माझ्या जावयाचा मोबाईल तुम्ही जप्त केला. चार वर्षांपूर्वींचा लॅपटॉप जप्त केला.
जावयाच्या मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांनी कोणी दिला, असाही मोठा प्रश्न यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. काहीही झाले तरीही या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. हे सर्व ठरवून केल्याचे म्हणण्यास वाव आहे. रेव्ह पार्टी म्हणून बदनाम करण्याचा का प्रयत्न केला जात आहे?, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान खडसेंनी पोलिसांवर केलेल्या आरोपावर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोठं भाष्य केलं. एकनाथ खडसे यांच्या कारवाईवर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘जी कारवाई झाली, त्याची विस्तृत माहिती दिली आहे. पारदर्शरक आणि कायदेशीर कारवाई होईल. कोणीही पोलिस दलावर शंका ठेवायची गरज नाही. कोणत्याही प्रकाराचा फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही’.











