⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मग महाजन बेडकाबरोबर कसे काय जातात?’, खडसेंचा खोचक टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर (Shivsena) घणाघात केला आहे. शिवसेना म्हणजे गटारातली बेडूक, असा घणाघात महाजनांनी केला. दरम्यान, महाजन यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा देखील उल्लेख केला.

एकिकडे गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. मात्र दुसरीकडे जिल्हातील शिवसेनेच्या पालक मंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. छुपी युती करतात. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही,असे खडसे म्हणाले आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

शनिवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत भाजपवर सडकून टीका केली. यानंतर भाजपकडून प्रत्त्यतर दिले जात आहे. अशातच गिरीश महाजन यांनी देखील शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ‘शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. तसंच, ‘गटरातील बेंडूक’ म्हणून महाजन यांनी शिवसेनेचा (shivsena) उल्लेखही केला.

महाजन यांच्या याच टिकेवरून खडसेंनी देखील शिवेनला कानपिचक्या दिल्या. मला वाटते याचे उत्तर तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले पाहिजे. बेडूक आहे का हत्ती आहे? गिरीश महाजन सातत्याने महाविकासआघाडीवर टीका करतात. शिवसेनेला बेडूक म्हणतात. ते एकीकडे शिवसेनेला हिणवतात आणि दुसऱ्या बाजूला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबरोबर जाऊन चहा घेतात, जेवण करतात, छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्याचे चित्र वेगळं आहे. बेडकाबरोबर कसे काय ते जातात मला माहित नाही. याचं सविस्तर उत्तर जे आहे ते शिवसेनेच्या अधिकृत प्रवक्त्याने देणे आवश्यक आहे”, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.