⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘अमृत’ योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अठरा हजार नळाना पाणी सुरू !

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । अमृत’योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अठरा हजार नळाना पाणी सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहे, तसेच चाचणीही पूर्ण झालेली त्या ठिकाणी नागरिकांनी स्वत: आपल्या मुळ जोडणीला अमृत योजनेची जोडणी करून घ्यावी असे अवाहनही महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

शहरातील अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काही भागातील जोडणी पूर्ण झाली आहे. नळाव्दारे पाणीही सुरू करण्यात आले आहे. शहरात एकूण ८० हजार नळकनेक्शन आहेत, त्यापैकी १८ हजार नळाना ‘अमृत’योजनेचे पाणी सुरू झाले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. यात खेडी, सुप्रीम कॉलनी, जय नगर, जुने गाव, शिवाजी नगर अशा भागात पाणी सुरू करण्यात आले आहे. साधरणत: २५ टक्के भागात आता ‘अमृत’योजनेव्दारे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे.

‘अमृत’योजनेतर्गंत मूळ जलवाहीनीतून घरगुती नळकनेक्शन जोडून देण्यात आले आहे. निळी नळीचे कनेक्शन दारापर्यंत आणून देण्यात आले. या नळीव्दारे पाणी येत असल्याची चाचणी महापालिकेतर्फे करण्यत येत आहे. तीन दिवस चाचणी झाल्यानंतर नागरिकांना नळ कनेक्शन जोडून घेण्याबाबत सांगण्यात येत आहे. नागरिकांनी खासगी प्लबंरकडून हे कनेक्शन आता आपल्या घरगुती कनेक्शनला जोडून घ्यावयाचे आहे, त्यासाठी महापालिकेचे कोणतेही कर्मचारी येणार नाहीत. असेही पाणी पुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात एकूण ८० हजार नळकनेक्शन आहेत.त्यापैकी १८ हजार नळकनेक्शन ‘अमृत’योजनेवर जोडणी करण्यात आलेले आहेत. तब्बल साठ हजार नळ कनेक्शन अद्यापही जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. यातील काही पहिल्या टप्प्यातील आहेत. त्या ठिकाणी काम सुरू आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या पिंप्राळा रेल्वेलाईन खालून जलवाहीनी टाकण्याचे काम बाकि आहे, त्याचे पैसेही रेल्वेला भरण्यात आले आहे. त्यांच्याकडून मंजूरी मिळाल्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल. तसेच दुसऱ्या टप्प्यावर अनेक भाग आहेत. त्यामुळे दुसरा टप्प्याचे काम झाल्यानंतर संपूर्ण ८०हजार नळांना अमृत योजनेचे पाणी मिळणार आहे. परंतु दुसरा टप्पा अद्यापही तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यावरच अडकला आहे.