जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. “केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन असलेल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात कपात, 25 लाख रोजगार निर्मिती अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. यामुळे महायुतीचा जाहीरनामा चांगलाच चर्चेत आहे.
लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ट्रम्पकार्ड मानले जात आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात पहिलेच आश्वसन लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणारी पंधराशे रुपयाची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. या योजनेवर विरोधकांनी आधी जोरदार टीका केली होती. ही योजना बंद पडेल, असा संभ्रम देखील पसरवण्यात आला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणुकीनंतरही ही योजना सुरु राहील, हे त्याचे संकेत आहेत. त्यामुळे 2100 रुपयांचे वचन महायुतीकडून पाळले जाईल अशी खात्री महिलांना आहे. जाहीरनाम्यात महिलांना प्राधान्य देताना महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्याचे आश्वासन देखील महायुतीने दिले आहे.
संकट अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात
निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांना कर्जमाफीसह शेतकरी सन्मान योजनेतून मिळणारी रक्कम बारा हजार वरून पंधरा हजार रुपये करणार, एमएसपी वर 20 टक्के अनुदान देणार असल्याचेही महायुतीने स्पष्ट केले आहे. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाराण देणार असून वृद्ध पेन्शन धारकांची पेन्शनची रक्कम पंधराशे रुपये वरून 2100 रुपये करणार असल्याचा वादा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न
राज्यातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. यासह 25 लाख रोजगार निर्मिती आणि दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल. यासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तब्बल 45 हजार गावांमध्ये पानंद रस्ते बांधण्याचे वचन महायुतीने दिले आहे. शेतकऱ्यांना मोफत कृषी दिन मिळण्याची योजना सरकारने यापूर्वीच सुरू केली आहे. आता विज बिलात 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार असल्याचे जाहीरनाम्यात नमुद करण्यात आले आहे. एकूणच महायुतीच्या जाहीरनाम्यात महिला, वृद्ध, तरुण, शेतकरी अशा सर्वच समाज घटकांचा बारकाईने विचार करण्यात आला असून त्यांच्या कल्याणासाठी योजनांचे सुतोवाच करण्यात आले आहे.