⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

खुशखबर.. खाद्यतेलाच्या किंमतीत लिटरमागे ५० रुपयांची घसरण

जळगाव लाईव्ह न्युज । २८ जून २०२२ । मागील काही काळात खाद्य तेलाचे दर प्रचंड वाढले होते. यामुळे सर्वसामान्य होरपळला होता. मात्र आता खाद्य तेलाच्या किंमतीत आठवडाभरात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरात सोयाबीन तेल, पाम तेल, सूर्यफूल तेलाच्या घाऊक बाजारातील किंमतीत लिटरमागे ५० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या आणि तेलबियांच्या किंमतीत मोठी घसरण झाली. परिणामी तेल आयातदारांना खरेदी भावाच्या तुलनेत ५० ते ६० डॉलर कमी दराने मालाची विक्री करावी लागत आहे. यामुळे घाऊक बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, मोहरीचे तेल लिटरमागे तब्बल ५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

मलेशियातील कमॉडिटी बाजारात क्रूड पाम ऑइलचा भाव २०० ते २५० डॉलरने गडगडला आहे. यामुळे पाम तेलाची आयात स्वस्त झाली आहे. मलेशियाकडून कच्चे पाम तेल आयात केले जाते.मागील वर्षभर खाद्य तेलाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. त्याला अनेक कारणे होती. रशिया-युक्रेन युद्ध, मलेशियाकडून पाम तेल निर्यातीवर निर्बंध यासारख्या कारणांमुळे तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या.

याशिवाय पाम तेल आणि सोयाबीन तेल, मोहरीचे तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. मोहरीची आवक निम्म्याने कमी झाल्याचे बोलले जाते. तरिही किंमतीत घसरण झाली आहे. मोहरीचा भाव प्रती क्विंटल ७,४१० ते ७,४६० रुपयांच्या दरम्यान असून त्यात ३० रुपयांची घसरण झाली आहे. सोयाबीनचा भाव देखील प्रती क्विंटल ७५० रुपयांनी कमी झाला आहे. शेंगदाणा तेलाच्या किंमतीत प्रती लिटर ७० रुपयांची घसरण झाली आहे.

नवा स्टॉक लवकरच बाजारात
मागील आठवड्यात प्रमुख खाद्य तेल उत्पादक अदानी विल्मर आणि मदर डेअरी या कंपन्यांनी विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमतीत प्रती लीटर १० ते १५ रुपयांची कपात केली होती. दरम्यान नव्या किंमतींनुसार किरकोळ बाजारात तेल आणखी १० ते १५ रुपयांनी स्वस्त होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.