Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची निवड झाल्याबद्दल पाचोरा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटल भाजपा कार्यालय येथे एकत्र येऊन पेढे भरवुन फटाके वाजवत व घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
हा विजय संपूर्ण देशात जनतेचा विजय असून एका सामान्य कुटुंबातील व देशातील सर्वात दुर्लक्षित आदिवासी समुदायातून व विशेषता एक महिला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी पदावर विराजमान होत आहेत. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.