जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेल, गॅस, खाद्यतेलासह इतर सर्वच वस्तू महागल्याने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. अशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे जळगावमध्ये आता एका सिलिंडरसाठी १००५ रुपये मोजावे लागणार आहेत.
कंपन्यांकडून मागील गेल्या महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यात १४.२किलो सिलिंडरची किंमत ९५५ रुपये इतकी होती. मात्र त्यात आता तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सिलिंडर एक हजार रुपयांवर गेला आहे. इतिहासात पहिल्यांदा गॅस सिलिंडर इतका महाग झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी देखील ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तर गेल्या वर्षीच्या मे महिन्यात गॅस सिलिंडरची ८१० रुपयांपर्यंत होती. त्यात आता एका वर्षात तब्बल २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम गेल्याने अनेक जण बेरोजगार झाले. त्यात दिवसेंदिवस वाढत असलेली महागाईमुळे सर्वसामन्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. वाढत्या महगाईमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आधीच पेट्रोल डिझेल सह खाद्यतेलाच्या प्रचंड महागले असून त्यात आता गॅस दरवाढीचा भार सर्वसामान्यांना पेलावा लागणार आहे.