जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या क्रूर हत्येनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले असून राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे.

संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती.
यातूनच अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. याविषयीची घोषणा ते विधानभवनात करतील.