जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२५ । मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे व पत्रकार अनिल थत्ते या दोघांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली असून यामुळे पुन्हा एकदा महाजन-खडसे संघर्ष पेटणार आहे.

नेमकं प्रकरण काय?
मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या एका कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करताना आपणास त्या महिला अधिकाऱ्याचे नाव माहीत असून, आपण ते उघड करणार नाही, असा दावा केला होता.
यांनतर गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांना आपण अब्रुनुकसानीची नोटीस बजावली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर टीका केली. जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाली आहे. आपण न्यायालयात या दोघांविरोधात लढणार असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.