जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२५ । यावल तालुक्यातील अंजाळे येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात गावापासून जवळच असलेल्या तापी नदीवर अंघोळ व कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली सतीश भिल (वय २८), त्यांचा मुलगा नकुल सतीश भिल (वय ५, दोन्ही रा.अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावात एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
अंजाळे (ता. यावल) येथे घाणेकर नगरातील बादल भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी वैशाली भिल व सपना सोनवणे या दोन्ही बहिणी असून त्या अंजाळे येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. यामुळे बरेच जण अंजाळे येथे मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी वैशाली व सपना या नकुलला घेऊन गावापासून जवळच असलेल्या तापी नदीवर अंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले होते. मुलाला घेऊन दोघी बहिणी नदीत उतरल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण नदीत बुडाले.
दरम्यान नकुलची बहिण अनू धावत घराकडे आली आणि मामाला म्हणाली, नकुल पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी आई व मावशीने पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, त्या पण पाण्यात दिसत नाही. ते ऐकताच सर्वजण नदीकडे धावत आले. मात्र, तोपर्यंत तिघे मृत झाले होते. याबाबत यावल पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत तपास केला. पोलिस पथकाने तिघांचे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.