जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । मागच्या गेल्या काही दिवासात अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा परिणाम भारतीय सरफा बाजारात दिसत असून सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जीएसटीसह प्रथमच ९५ हजारावर पोहोचला आहे. यामुळे एन लग्नसराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. यातच सोन्याचा भाव कधी कमी होतील? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. परंतु जागतिक गुंतकवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सने सोन्यात तुफान तेजीचा अंदाज वर्तवला आहे. सोन्याचे दर 1,36,000 पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे, २०२५च्या अखेरीस सोन्याची किंमत वाढू शकते. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेला ट्रेड वॉर आणि जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर 2025 मध्ये 4500 डॉलर प्रती आउंसवर पोहचणार आहे. गोल्डमॅन सॅक्सने तिसऱ्यांदा सोन्याच्या दर वाढीबाबत अंदाज बदलवला आहे. त्यापूर्वी या संस्थेने या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने 3700 डॉलर प्रती आउंस जाईल, असा अंदाज वर्तवला होता. तसेच पहिल्यांदा अंदाज वर्तवताना 3300 डॉलर प्रति आउंस किंमत निश्चित केली होती.
गेल्या आठवड्यात गोल्ड ईटीएफने पहिल्यांदाच प्रति औंस 3200 डॉलरचा टप्पा ओलांडला. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे गोल्ड ईटीएफचा दर प्रति औंस 3245.69 डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. भौतिक आणि विनिमय व्यापारात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.