जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । मन्यारखेडा येथील गिरणा पाटबंधारे विभागाच्या तलावात सांडपाण्यासह एमआयडीसीतील कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी तलावात सोडले जात असलेल्या विषारी पाण्यामुळे तलावातील तब्बल 50 ते 60 क्विंटल पेक्षा जास्त माशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी तलावावर मासेमारी करण्यासाठी मच्छीमार आल्यावर धक्कादायक घटना समोर आली आहे.
मासे मृत झाल्याचे आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मत्स्य व्यवसाय विभागासह तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली, मत्स्य व्यवसाय विभागाने माशांचे तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने घेतले असून, देन्ही नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मन्यारखेडा येथे गिरणा पाटबंधारे विभागांचा साठवण तलाव आहे. या तलावात मत्स्यपालन करण्याचा ठेका मत्स्यव्यवसाय विभागाने आदिवासी मच्छीमार संस्थेला दिला आहे. संस्थेने या तलावात १० लाख लालपरी, ५ लाख कथलाचे मत्स्यबीज टाकले होते. त्याशिवाय गावरान मासेही या तलावात होते. संस्थेने आतापर्यंत २० क्विंटलवर मासे या तलावातून काढले; मात्र या तलावात थेट नाला काढून सांडपाणी सोडले आहे. तलावालगतच्या फातेमानगरचे सांडपाणी, जळगाव एमआयडीसीतील कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी या तलावात सोडण्यात येत असल्याचे आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन सैंदाणे यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना याबाबत संपर्क करून कळवले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार शीतल राजपूत, आरोग्य विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांना सूचना दिल्या.
या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. केमिकलयुक्त पाण्यामुळे तलावातील कोरड्या झालेल्या मातीनेही पेट घेतला होता. त्यामुळे सांडपाण्यात केमिकलयुक्त पाणी असल्याचा संशय आहे. एमआयडीसीतील कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी तलावात सोडण्यात येत आहे. त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे; मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या पाण्यामुळे मासे मूत झाल्यामुळे ५० ते ६० क्विंटलवर मासे मृत होऊन नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई कारवाई करण्यास निष्काळजीपणा करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने द्यावी, अशी मागणी सैंदाणे यांनी केली आहे.