सावखेडा सिम येथे गटारीत आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक, परिसरात खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । यावल तालुक्यातील सावखेडा सिम गावातील गटारीत स्त्री जातीचे मृत अर्भक आढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले.
मिळालेल्या माहितीनूसार, सावखेडा सिम गावात सोमवारी एका व्यक्तीस गटारीत स्त्री जाती मृत अर्भक टाकुन दिल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी गटारीतून हा ब्रक बाहेर काढला गावातील पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना सांगितले. दरम्यान हा प्रकार पाहण्यासाठी सावखेडा सिम गावातील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती.
यावेळी पोलीस पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृत अर्भकास पंचमाना करीत ताब्यात घेतले आहे . दरम्यान अशा प्रकारे मृत अर्भक फेकुन दिल्याची दोन महीन्यातील दुसरी घटना आहे. यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, एकीकडे अनेक सामाजिक संघटना स्त्री भ्रूणहत्या विरोधात लढा तीव्र करत असताना, दुसरीकडे स्त्री जातीचे अर्भक सापडले हे अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणजे आजही समाजामध्ये स्त्री विषयक किती द्वेष केला जातो, स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदलला नाही हे या घटनेवरून सिद्ध होते. मात्र, सावखेडा सिममध्ये सापडलेल्या या स्त्री जातीचे अर्भक आढळल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.