⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कपाशीच्या पिकात झाले नुकसान, कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । कर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना बोदवड तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नितीन गणेश राणे (वय ३६, रा. वरखेड ता. बोदवड) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांची गावातच शेती असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गेल्यावेळेस शेतात कपाशीची लागवड केली होती. परंतु त्यातून निम्म उत्पन्न देखील मिळाले नाही. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यातूनच नितीन राणे यांनी शेतात फवारणीचे औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, उपचार सुरु असताना दि. १० रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.