कर्तव्यात हलगर्जीपणा नडला; बोदवडच्या दोन पोलिसांची तडकाफडकी मुख्यालयी रवानगी!

मे 22, 2026 4:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड येथे घडलेल्या अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सुरी) याच्या खूनप्रकरणानंतर बोदवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने पोलीस मुख्यालयी जमा करण्यात आले आहे. मोहन चौधरी आणि रवींद्र गुरचळ अशी या कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Bodwad

काय आहे नेमकं प्रकरण?

मृत अन्सार पिंजारी याच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी त्याने बोदवड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली होती. या चोरीत त्याने गावातीलच अरबाज शहा लतीश शहा (वय २५) या संशयित तरुणावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संशयित अरबाज याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले, मात्र प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून दिले होते.

पोलीस ठाण्यातून सुटल्यानंतर आरोपी अरबाज शहा याने अन्सारला थेट धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर त्याने सोशल मीडिया स्टेटसवर ‘आज तेरा गेम होगा’ असा मजकूर ठेवून अन्सारला उघड आव्हान दिले होते. या जीवघेण्या धमकीबाबत अन्सारने अत्यंत भीतीपोटी बोदवड पोलिसात पुन्हा तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या संवेदनशील तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. पोलिसांच्या याच निष्काळजीपणामुळे बुधवारी (२० मे)दुपारी आरोपीने अन्सारचा खून केला.

अन्सारच्या खुनाची बातमी पसरताच बोदवड शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त जमाव आणि नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत, दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचारी मोहन चौधरी आणि रवींद्र गुरचळ यांना पोलीस मुख्यालयी जमा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

अन्सारचा खून केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अरबाज शहा याला बोदवड पोलिसांनी बुधवारी रात्रीच भुसावळ येथून शिताफीने अटक केली. गुरुवारी त्याला भुसावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, या संवेदनशील खुनाचा पुढील तपास वरिष्ठ पातळीवरून वरणगावचे पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now