बोदवडचे ‘एपीआय’सह तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी तडकाफडकी निलंबित! जिल्हा पोलीस दलात खळबळ

मे 22, 2026 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर बोदवड पोलीस ठाण्यातील कमालीचा हलगर्जीपणा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश समोर आले असून याप्रकरणी वरिष्ठ पोलीस प्रशासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)सह तीन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

Maharashtra Police Bharati 2022

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर, एएसआय रविंद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या कारवाईने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विभागीय चौकशी अहवालातून पोलीस ठाण्यातील धक्कादायक अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर वादात दोन्ही गटांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे स्पष्ट संकेत असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती पावले उचलली नाहीत. त्यामुळेच वाद विकोपाला जाऊन अखेर हत्या घडल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे दोन्ही गटांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात न घेता आवश्यक चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, टाऊन बीट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ यांनीही परिस्थिती गांभीर्याने हाताळली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. १९ मे रोजी दोन्ही गटांमध्ये वाद झाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. मात्र संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून कठोर कारवाई न करता सोडून देण्यात आले. त्यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर पुढील गंभीर घटना टाळता आली असती, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांना फोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे वादाची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिस्थिती संवेदनशील असल्याचे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी स्वतः कोणतीही ठोस कारवाई केली नाही किंवा अधीनस्थ कर्मचाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले नाहीत. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कंट्रोल रूमलाही वेळेत माहिती न दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

या तिघांच्या निष्क्रियतेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आणि अखेर हत्या घडल्याचा ठपका विभागीय अहवालात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तिघांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून पुढील विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now