जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चोरीचा संशय व्यक्त केल्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अन्सार पिंजारी असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शहरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत अन्सार पिंजारी आणि संशयित आरोपी अरबाज शाह हे दोन्ही तरुण एकमेकांच्या परिचयाचे होते. काही दिवसांपूर्वी अन्सार पिंजारी यांच्या घरात एक चोरीची घटना घडली होती. या चोरीमागे अरबाज शाह याचाच हात असावा, असा संशय अन्सारने व्यक्त केला होता.

आपल्यावर चोरीचा संशय घेतल्याचा तीव्र राग अरबाजच्या मनात होता आणि याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने अन्सारचा काटा काढण्याचे ठरवले. आज याच वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले आणि आरोपी अरबाज शाह याने अन्सारवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेला अन्सार जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. हत्येच्या या घटनेची माहिती मिळताच बोदवड स्थानिक पोलिसांसह जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तातडीने बोदवड येथे घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
घटनेनंतर संशयित आरोपी अरबाज शाह हा फरार झाला असून, बोदवड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.












