⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जिल्हा दूध संघाच्या मतमोजणीला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज रविवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लवकरच येथे कुणाची सरशी होणार हे कळणार आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलेच तापले गेलं होते. यावरून आरोप-प्रत्यारोप होत होती. काल म्हणजेच शनिवारी १९ जागांसाठी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रावर ४४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा दूध संघाच्या मतदानात १०० टक्के मतदान झाले आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.

यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यात शेतकरी पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश तर सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याने निवडणूक चुरशीची झाली.

दरम्यान, आज रविवारी सकाळी आठ वाजेपासून रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी सात टेबल असून 22 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन तासांत विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यात कुणाची सरशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.