जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी परीक्षा आज म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झालीय. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर पार पडला. मात्र जळगाव मध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

जळगावात दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा ढीग पाहायला मिळाले. जळगाव शहरातील अनेक दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहादरांकडून विद्यार्थ्यांना सर्रास कॉप्या पुरवल्या गेल्या. काही परीक्षा केंद्रावर तर हद्दच झाली. थेट पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर परीक्षार्थींना कॉपी पुरवताना दिसले.
काही परीक्षा केंद्रांवरून तर शिक्षक वृंद देखील पिशवी घेऊन भिंतीवरून उडी मारत असतानाच चित्र पाहायला मिळाले. परीक्षा केंद्राच्या बाहेर तसेच छतावर कॉप्यांचा ढीग, तर परीक्षा केंद्राबाहेर टवाळखोरांची गर्दी पाहायला मिळाली.
एकीकडे बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना पहिल्याच पेपरला सर्सास कॉपी पुरवल्या गेल्याचे चित्र पाहायला मिळालं.
दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपर फुटला
दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे जालन्यानंतर यवतमाळमध्ये पेपर फुटला आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या घडलेल्या प्रकरणानंतर आता या प्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार? याकडे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.