जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ, कृषी प्रक्रिया, निर्यात, बाजार व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी सन २०२६-२७ मध्ये राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत युरोप व चीन येथे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत.

योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये किमान एक महिला शेतकरी तसेच एक राज्य किंवा केंद्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी असणे आवश्यक आहे.

अर्जदार शेतकरी स्वतः शेती करणारा असावा तसेच AgriStack अंतर्गत Farmer ID, वैध पासपोर्ट व किमान २५ वर्षे वय असणे आवश्यक आहे. शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. पात्र अर्जांची पारदर्शक सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार असून अंतिम निवडीचा अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राहणार आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कु.मु. तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.









