महासभेत गोंधळ : जळगाव मनपातील ठेकेदारांची नार्को टेस्ट करा, सुनील महाजन यांची मागणी

मार्च 24, 2022 3:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । शहर मनपाची महासभा गुरुवारी मनपाच्या सभागृहात पार पडली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मागील महासभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यावरून भाजप-शिवसेनेत वाद निर्माण झाला. गेल्या महासभेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील वाढीव कामांच्या संदर्भातील तो विषय होता. भाजप आक्रमक होत असल्याने विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी चक्क घनकचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. तसेच लागलीच सभागृह नेते ललित कोल्हे यांनी कचरा संकलनच्या मक्तेदाराची देखील नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.

manapa mahasabha jpg webp

जळगाव शहर मनपाचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी महासभेत सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय सभा दि.३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महासभेला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी व्यासपीठावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

महासभेच्या सुरुवातीलाच मागील महासभेचे इतिवृत्त कायम करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. भाजपकडून ऍड.शुचिता हाडा यांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवित गेल्या महासभेत भाजपकडून मी आमचा विरोध असल्याचे म्हटले होते. इतिवृत्तात त्याचा उल्लेख आहे परंतु ठराव मंजूर करताना ते घेण्यात आलेले नाही. महापालिकेत बेकायदेशीर कामकाज होत असून लोकशाहीची हत्त्या केली असल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी त्यावर उत्तर देत केवळ आपला विरोध नोंदविण्यात आला होता तो संपूर्ण भाजपचा नव्हता असे सांगितले. तसेच त्या ठरावाविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकतात. शासनाकडे ठराव विखंडनासाठी पाठवू शकतात ते पर्याय आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी, आपल्या महापालिकेत सर्व विषय सामंजस्याने मान्य केले जातात. त्यात कुठेही भेदभाव होत नाही. जळगावकरांच्या हितासाठी जे योग्य आहे ते योग्य पद्धतीने व्हायला हवे. काही विषय पक्षाच्या बैठकीत ठरतात आणि त्यावर एक सदस्य आपले मत मांडत असतो त्यामुळे नवीन पायंडा पाडू नये. असे असल्यास प्रत्येक विषयावर मतदान घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक कैलास सोनवणे, ऍड.शुचिता हाडा, दीपमाला काळे यांच्यासह भाजप नगरसेविका आक्रमक झाल्या. गेल्या महासभेत मांडण्यात आलेले मुद्दे आणि शब्द सर्व ऍड.शुचिता हाडा यांनी वाचून दाखविले.

दोन्ही पक्षांकडून जोरदार वादविवाद झाल्यावर १८ कोटींचे काम घेणारा तो माणूस कोण हे एकदा तरी पाहू द्या. काळा का गोरा, कसा आहे ते समजू द्या असा टोला नगरसेवक कैलास सोनवणे यांनी लगावला. घनकचरा प्रकल्पाच्या वाढीव कामावरून होत असलेल्या गोंधळात ते काम घेणाऱ्या मक्तेदाराची नार्को टेस्ट करा म्हणजे तो कोणाला भेटला, कुठे गेला, काय बोलला हे सर्व सत्य समोर येईल अशी मागणी शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केली. महाजनांच्या मागणीनंतर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी आक्रमक होत गेल्यावेळी मोठा ठेका घेणाऱ्या मक्तेदाराची देखील नार्कोटेस्ट करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी अमृत योजना, कचरा संकलन, घनकचरा प्रकल्पाच्या मक्तेदाराची देखील नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली.

मोठ्या गोंधळानंतर आज सभेत झालेल्या सर्व चर्चा इतिवृत्तात घेऊन पुढील कामकाजाला सुरुवात करावी असे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी महापौरांनी विनंती करीत, चुकीच्या सवयी पडू देऊ नये, अशी विनंती केली. त्यानंतर महासभेचे पुढील कामकाज सुरु झाले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now