जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरातील सप्तशृंगी माता मंदिर परिसरात सुरु असलेल्या कीर्तनात बूट घालून नारदाच्या गादीचा अवमान व राम महाराज यांना धमकाविल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक के.के पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यभरात या प्रकरणी वारकरी संप्रदाय आक्रमक झाले असून आज रोजी राम कृष्ण पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निरीक्षक के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रारीचे निवेदन दिले.

चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौक परिसरात सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी २७ रोजी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १० वा. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील आले व व्यासपीठावर बूट घालून तुमचे किर्तन बंद करा, माझे कीर्तन ऐका असे बोलत कीर्तनकार्यांना धमकावले. तिथेच मृदंग वाजवणारे राम कृष्ण पाटील उर्फ राम महाराज यांना आता मृदुंग वाजवणे बंद कर नाहीतर मी तुला वाजवेल अशा भाषेत अरेरावी केल्याप्रकरणी राम महाराज यांनी आज चाळीसगाव शहरात पी आय के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या प्रसंगी वारकरी संप्रदायातील वारकरी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.












