जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत आयोगाचा मोठा निर्णय..

सप्टेंबर 24, 2025 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मनपा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. यातच राजकीय पक्षाकडूनही तयारी सुरू केली असून अशातच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.

loksabha election jpg webp

राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.

हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now