जळगाव लाईव्ह न्यूज । इस्राईल-इराण युद्धाची झळ भारतावर दिसून येत असून एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबतच्या चर्चावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. मात्र जळगावकरांना चिंता करण्याची गरज नाहीय. कारण जळगाव जिल्ह्यात परेसा गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती वितरक कंपन्यांनी कळविली आहे. केवळ २५ दिवसानंतर नवा सिलिंडर उपलब्ध करण्याच्या शासनाच्या सूचना असून त्यानुसार माहिती संबंधित कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

सोशल मीडियावर इंधन तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व आयओसीएल गॅस कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींसह गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेविषयी विचारणा केली होती. त्यानुसार या तीनही कंपन्यांनी जिल्ह्यातील ग्राहकांसाठी पुरेसा सिलिंडरचा साठा उपलब्ध असल्याची माहिती कळविली आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आवश्यकतेनुसारच सिलिंडर बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आखाती देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढले आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ११५ रुपयांनी महागला आहे. त्यातच तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता दोन सिलिंडर बुक करण्यामध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काहींनी सोशल मीडियावर गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चुकीची माहिती व्हायरल केली. त्यामुळे ग्राहकांमध्ये गैरसमज पसरल्याचे गॅस कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योग संकटात?
सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आधारित हॉटेल, छोटे-मोठे उद्योग संकटात सापडलेले असून व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाला तर उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. उद्योग जर बंद पडले तर परिणामी कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार देखील बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.







