⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

थंडीचे जोरदार ‘कमबॅक’, उबदार कपड्यांचा बाजार ‘हॉट’

जळगाव लाईव्ह न्यूज । निलेश अहेर । मकर संक्रांतीनंतर परतीच्या मार्गावर असलेल्या थंडीने जोरदार कमबॅक केले असून जळगावकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पारा १० च्या आत येत असल्याने उबदार कपड्यांच्या बाजारात चांगलीच गर्मी निर्माण झाली आहे. उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून विक्रेते सुखावले आहेत.

गेल्या दोन दिवसापासून थंडी पुन्हा परतली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान मंगळवारी सकाळी ७ अंश तर बुधवारी ८ अंश नोंदवले गेले. शिमला परिसरात गेल्या चार दिवसापासून दमदार बर्फवृष्टी होत असल्याने त्याचा प्रभाव महाराष्ट्रात देखील जाणवण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात थंडीचा कडाका आणखीन वाढणार असून नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. मकर संक्रांतीच्या सणानंतर दूर पळणारी थंडी गेल्या काही वर्षापासून सक्रांती नंतरच वाढत आहे.

शक्यतो नागरिक मकर संक्रांतीनंतर उबदार कपडे पुन्हा गुंडाळून कपाटात ठेवून देण्याच्या तयारीत असतात. यंदा मात्र ते पुन्हा बाहेर काढावे लागत आहे. गेल्या आठवड्यात थंडीत जाऊन उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात होईल असे वाटत असताना सोमवारपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. दोन दिवसापासून पारा अचानक खाली आला असून किमान १५ ते २० अंशावर असलेले तापमान ७ ते १० अंशावर स्थिरावले आहे. थंडी आणि गार वारा वाढल्याने नागरिकांना पुन्हा उबदार कपड्यांची गरज भासू लागली आहे.

मकर संक्रांतीपर्यंत थंडी फारशी न जाणवल्याने अनेकांनी नवीन उबदार कपडे खरेदीचा बेत टाळला होता मात्र आता त्यांना पुन्हा खरेदी करावी लागत आहे. जळगाव शहरातील नेपाळी वुलन मार्केट आणि मराठी वुलन मार्केटमध्ये नागरिकांनी कपडे खरेदीसाठी गर्दी केली आहे. विशेषतः कानपट्टा, मफलर, हॅन्ड ग्लोज, उबदार टोपी, हेडफोन मास्कला प्राधान्य दिले जात आहे. स्वेटर आणि उबदार जॅकेटमध्ये देखील अनेक नवनवीन प्रकार बाजारात उपलब्ध असून लॉकडाऊन आणि महागाईमुळे उबदार कपड्यांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जी.एस.ग्राउंड परिसरातील मार्केट कमिटीचे अध्यक्ष माधवराव रामसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार. यावर्षी लेडीज, जेन्ट्स यांच्या जॅकेट, स्वेटर, लोकरी शाल, टोपी इत्यादी वस्तूंच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील ग्राहक देखील येत नसल्याने मंदी वाढली आहे. लॉकडाऊन असल्याने व थंडीच्या प्रभावामुळे यावर्षी सगळ्या वस्तूंची किमतीत यंदा २० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी वाढल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी देखील वाढली आहे.

हे देखील वाचा :