ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । एकीकडे राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, जळगावात आज दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कायम आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याच दरम्यान, आज जळगावात दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा घसरला. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी जळगावचे तापमान ३९ अंशापर्यंत नोंदविले गेले होते.