⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नागरिकांनो.. बनावट एसएमएसपासून सतर्क रहा!

BHusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मागील काही महिन्यांचे वीजबिल अपडेट नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ शकतो. त्वरित सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या वीज ग्राहकांना येत आहेत. ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने अशा एसएमएसपासून ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी केले आहे.

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. वीज ग्राहकांनाही वीज बिलासंदर्भात फसवे एसएमएस येऊ लागले आहेत. वीज ग्राहकांना एसएमएस येत असल्याने त्यांनी याबाबत सावध असावे. वीज ग्राहकांना येत असलेल्या एसएमएसमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाईल. वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी एसएमएसवरील क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात येते. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहकांना विशिष्ट ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यावर एखादा व्यवहार करण्याची सूचना केली जाते. तसे केल्यास त्या ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर वळती करून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी सावध राहावे, असे आवाहन भुसावळ शिवसेनेने केले आहे.

महावितरण बिलाबाबतचे एसएमएस कोणत्याही भ्रमणध्वनीवरून न पाठवता ‘महावितरण’ द्वारेच पाठवले जातात. जर वीजबिलाबाबत अथवा वीजपुरवठा ग्राहकांना येणाऱ्या एसएमएसमध्ये खंडित करण्याबाबतचा लघुसंदेश या व्यतिरिक्त एखाद्या कोणत्याही भ्रमणध्वनीवरून आल्यास तसेच संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले असल्यास अशा प्रकारच्या लघुसंदेशांना प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन प्रा.पाटील यांनी ग्राहकांना केले आहे. तुमचा पासवर्ड ओटीपी पिन चोरण्यासाठी आणि तुमची फसवणूक करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन व्यवहार करण्यास सांगणारा हा फसवा लघुसंदेश असू शकतो.