⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

बालिका अत्याचार प्रकरण : ३८ दिवसांत तपासले १३ साक्षीदार, दोन महिन्यात निकाल शक्य

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । न्यायालयीन कामकाज म्हणजे ‘तारीख पे तारीख’ असे म्हटले जाते. परंतु जिल्हा न्यायालयाने ताे पुसून काढत अत्याचाराच्या खटल्यात दोषाराेप दाखल झाल्यानंतर ३८ दिवसांत चक्क १३ साक्षीदारांची तपासणी केली. जिल्ह्याच्या इतिहासात जलदगती पद्धतीने चालवला जात असलेला बहुधा हा पहिलाच खटला असावा.

‘उशिराने मिळणारा न्याय हा देखील अन्यायच आहे’ असे बोलले जाते. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया वेळेत होणे अपेक्षित आहे. अनेक खटल्यांत पीडितांना न्याय मिळेपर्यंत सर्वच परिस्थिती बदललेली असते. त्यामुळे मिळालेल्या न्यायास काही महत्त्व नसते. अशात जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका चारवर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा सरकारी वकील ऍड. केतन ढाके यांनी न्यायालयास विनंती करून जलदगतीने खटला सुरू केला. २७ नोव्हेंबर रोजी या बालिकेवर अत्याचार झाला. त्यात सावळाराम भानुदास शिंदे या संशयितास दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी अटक केली. यानंतर घटनास्थळ पंचनामा, पीडितेचा जबाब, फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब असे अनेक कागदपत्रांचे पुरावे पोलिसांनी गोळा केले. अवघ्या १७ दिवसांत पोलिसांनी १५० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. ऍड. ढाके यांनी हा खटला जलदगतीने चालवावा अशी विनंती न्यायालयास केली. विशेष न्यायाधीश एस. एन. गाडकेर-माने यांनी परवानगी दिली. ३ ते २१ जानेवारी दरम्यान आठ दिवस खटल्याचे कामकाज चालले. यात एकूण १३ साक्षीदारांची तपासणी न्यायालयाने केली.

दरम्यान, अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे. अनेकवेळा पीडितांच्या कुटुंबीयांना जलदगतीने कामकाज होणे अपेक्षित असते. त्यामुळे न्यायालयास विनंती करून हा खटला जलदगतीने सुरू आहे. यात पोलिसांनीही तत्परतेने तपासकाम, दोषारोप दाखल केले आहे. असे जिल्हा सरकारी ऍड. केतन ढाके यांनी सांगितले.

हे देखील वाचा :