⁠ 
सोमवार, मे 27, 2024

पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या वेळी हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह स्टॅण्डिंग वॉरंट असलेले रेकॉर्डवरील ६ गुन्हेगारांना अटक केली आहे. नाकाबंदीत १३ वाहनांवर कारवाई केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कोम्बिंग ऑपरेश राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आसाराम मनोरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, संजयसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अनिल तायडे, मंगेश बागूल, दिनेश चौधरी, संदीप सपकाळे, सचिन पाटील, योगेश बारी, चेतन सोनवणे, सतीश गजे, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, गणेश वंजारी आदींनी रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला उदय रमेश मोची (रा. रामेश्वर कॉलनी), राहुल पांडे (रा. सुप्रिम कॉलनी), अजय बिरंजू गांरुगे (तांबापुरा), भोला राकेश बांगडे (रा. सुप्रिम कॉलनी), विशाल भागवत सुरवाडे, गोलू ऊर्फ राजकिसन मानसिंग परदेशी, आबा मधुकर पाटील (तिघे रा. रायपूर, कुसुंबा) यांना ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील १३ अट्टल गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीत १३ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.