जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२४ । भारतीय हवामान विभागाने देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु जून महिन्यात महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे सर्वाचे डोळे जुलै महिन्याकडे लागले आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केले. जळगावसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला होतं. मात्र, आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलंय.
आयएमडीच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला-निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.