⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सरकारचा मोठा निर्णय ! खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी रद्द ; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । मागील काही काळात खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. आता अशात सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मार्च 2024 पर्यंत वार्षिक 2 दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी आणि कृषी पायाभूत उपकर रद्द करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्यतेल स्वस्त होणार आहे.

खाद्यतेल स्वस्त होऊ शकते
मंगळवारी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक 20 लाख टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर कस्टम ड्युटी लावली जाणार नाही. आयात शुल्कातील ही सूट देशांतर्गत किमती खाली आणेल आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा सरकारचा विश्वास आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) ट्विटमध्ये लिहिले की, ‘या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.’ हे लक्षात घेण्यासारखे आहे की तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान सरकारने गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यासोबतच स्टील आणि प्लास्टिक उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

https://twitter.com/cbic_india/status/1529128204845617153

सोयाबीन तेलाचे भाव खाली येतील
सरकारने घेतलेल्या निर्णयाचा अर्थ असा आहे की 31 मार्च 2024 पर्यंत एकूण 8 दशलक्ष टन कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल शुल्कमुक्त आयात करता येईल. यामुळे देशांतर्गत किमती कमी होण्यास मदत होईल.

सोलव्हॅट एक्स्ट्रॅक्टर्स ऑफ इंडिया (SEA) चे व्यवस्थापकीय संचालक बीव्ही मेहता म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन तेलाची किंमत प्रति लिटर 3 रुपयांनी कमी होईल. सरकारने 20 लाख टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांसाठी TRQ बाबत अधिसूचना जारी केली आहे. मेहता म्हणाले की, TRQ अंतर्गत 5.5 टक्के कस्टम ड्युटी आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर काढून टाकले जातील.