जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । अल्लाह संपूर्ण विश्वात शांती नांदू दे, भारतात जे काही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आळा घाल व आम्हा सर्व समाजाला एकोप्याने ठेव अशा आशयाची प्रार्थना मौलाना उस्मान कासमी यांनी केली. दरम्यान हजारोच्या संख्येने उपस्थित नमाजी यांनी त्यावर आमीन शब्द उच्चारून त्यास अनुमोदन दिले.
जळगाव मुस्लिम ईदगाह ट्रस्टतर्फे अजिंठा चौका वरील मुस्लिम ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे पंचवीस ते तीस हजारच्यावर लोकांनी नमाज अदा केली. मुस्लिम ईदगाह ट्रस्टतर्फे सर्वप्रथम अध्यक्ष अब्दुल वहाब मलिक यांनी उपस्थित जळगावकरांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर करून उपस्थितांना ट्रस्टसाठी कसे व किती उत्पन्न मिळते व त्यातून शासकीय देणे किती द्यावे लागते. तसेच इतर धर्मदाय कार्यात किती खर्च होतो याबाबत स्पष्ट व सूक्ष्म अशी आकडेवारी सादर केली.
भविष्यातील ट्रस्टचे संकल्प – ईदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर स्वर्गीय अब्दुल गफ्फार मलिक यांच्या नावे सार्वजनिक पाणपोई सुरू करणे,
जुन्या मुख्य प्रवेशद्वारावर सुशोभिकरण करणे, मुख्य जुने प्रवेश द्वाराच्या बाहेर स्वच्छतागृह व सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक व लिपिक यांच्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था करणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या टेरेसवर २५ हजार स्क्वेअर फूट वर अत्याधुनिक दवाखाना सुरू करून ना नफा ना तोटा तत्त्वावर तो चालवणे. हे संकल्प व त्यासाठी लागणार खर्च याची ब्ल्यू प्रिंट सुद्धा फारूक शेख यांनी सादर केली.
आंतरराष्ट्रीय ठराव
फलस्तीन, बरमा, इराक़ आणि सिरिया इराक़, रशीया आणि युक्रेन, भारत, हिजाब असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सहा ठराव पारित करण्यात आले.
ईदगाह मैदानाबाहेर सामाजिक सलोख्याचे दर्शन
ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर जे लोक बाहेर जात होते त्यांना प्रशासनामार्फत तसेच काही राजकीय पक्ष व महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्याने जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे उपस्थिती होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी सह माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व रवींद्र पाटील यांनी व त्यांचे सर्व सहकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून दिल्या.
अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारुक शेख सहसचिव अनीस शहा, खजिनदार अश्फाक बागवान, उपाध्यक्ष रियाज मिर्ज़ा, माजी अध्यक्ष करीम सालार, जमीयत चे मुफ़्ती हारून, शहर ए काज़ी मुफ़्ती अतीकुर्रहमान, मौलाना सालिक सलमान, माजी उपाध्यक्ष हुसेन मुल्तानी, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एजाज मालिक,व्यवसायिक रहीम मलिक, सामाजिक कार्यकर्ते नदीम नालीक, एडवोकेट आमीर शेख, प्रोफेसर डॉक्टर गयास उस्मानी, प्रोफेसर डॉक्टर एम इकबाल,रागिब जागीरदार, सलीम इनामदार, मजहर खान, नगरसेवक रियाज बागवान व अक्रम देशमुख, हबीब इंजीनयर, जाहिद इंजीनयर, आदींची प्रमुख उपस्थिती होते.