जळगाव लाईव्ह न्यूज । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खान्देश लोककलावंत परिषद व व.वा.वाचनालयाच्या अनमोल सहकार्याने व.वा.वाचनालयाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम घेण्यात आला.महाराष्ट्राच्या अस्सल लोककला सादर करून विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने भाषिक नवचैतन्य निर्माण करण्यात आले. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात वहीगायन, पोवाडा, भारुड, गोंधळ, लावणी या लोककला प्रकारांचे दमदार सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण प्राचार्य डॉ.गौरी राणे ,व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह,शाहीर विनोद ढगे, प्रा.डाॅ.शुभदा कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सुरूवातीला खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे व समूहाने महाराष्ट्राचे राज्यगीत आपल्या पहाडी आवाजात सादर करून उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले. त्यानंतर खानदेशाची स्वतंत्र ओळख सांगणाऱ्या आणि अस्सल आपल्या मातीतील लोककला वहीगायन सादर करण्यात आली. जळगावच्या वाल्मीक वही मंडळाचे प्रमुख संतोष शामराव चौधरी व समुहाने ,गणपतीची वही, कानबाईची वही सादर करून विद्यार्थीनींना वहीगायन या लोककला प्रकाराची झलक दाखवून मंत्रमुग्ध केले.आयुष्यात प्रथमच महाविद्यालयाच्या मुलांसमोर वहीगायन हा कार्यक्रम होत आहे.अशा उत्स्फूर्त भावना वही मंडळाने बोलून दाखवली.या कलाप्रकाराची ओळख कला सादर होण्यापूर्वी गायत्री बारी या विद्यार्थिनीने उपस्थितांना करून दिली.
वहीगायनानंतर वीररस युक्त पोवाडा आणि भारुड या दोन कलाप्रकारांचे सादरीकरण शाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून उपस्थितांमध्ये वीररसाने ऊर्जा निर्माण केली.पराक्रमाचे पोवाडे गात आपल्या पहाडी आणि दमदार आवाजात शाहीर विनोद ढगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. सभागृहात उपस्थितांनी जयभवानी ,जय शिवाजीचा निनाद करीत सभागृह दणाणून सोडले.
पोवाडा गायल्यानंतर शाहीर विनोद ढगे यांनी प्रबोधनात्मक भारुड सादर करून विनोदी शैलीने हास्याचे कारंजे उडवत, दारुमुळे संसाराचा होणारा नाश आपल्या भारुड रूपकामध्ये सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. पोवाडा या कलेची माहिती मेघा बारी या विद्यार्थिनीने करून दिली. जळगावच्या अवधूत वामन दलाल व जयमल्हार गोंधळ पार्टीच्यासहकाऱ्यांनी गोंधळ हा कलाप्रकार सादर करून गोंधळाची परंपरा आणि कलेची माहिती देत गणपतीचे कवन सादर करत, येळकोट येळकोट जयमल्हार… चा आवाजात गोंधळ सादर केले. या कलाप्रकाराची ओळख निकीता सोनवणे या विद्यार्थिनीने करून दिली.
यानंतर महाराष्ट्राची लावणी या लोककलेचा परिचय मेघा बारी या विद्यार्थीनीने करून दिला. महाविद्यालयाची प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी किरण राजू बहारे हीने ठसकेबाज चंद्रा ही लावणी सादर करीत सर्वांना खिळवून ठेवले. शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थिनींनी लावणीला उदंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून लोककलेसंबंधीची भाषा समृध्दीची वाटचाल अधोरेखित करत कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या उन्नयनासाठी केलेल्या अनमोल साहित्य सेवेचा मागोवा मराठी विभाग प्रमुख डॉ.सत्यजित साळवे यांनी मांडला.मनोगतात डाॅ.शुभदा कुलकर्णी यांनी वाचन संस्कृती वाढावी,रूजावी यासाठी व.वा.वाचनालय जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह यांनी लोकगीत,लोककथा,उखाणी यांचा आणि लोक संस्कारांचा अनुबंध उलगडून दाखविला.प्राचार्य डॉ.गौरी राणे यांनी शालेय जीवनातील भाषेचा लळा सांगत असताना, भाषा म्हणजे आई, आई जितकी प्रिय, तितकीच भाषा आम्हाला प्रिय आहे, असे सांगितले.शाहीर विनोद ढगे यांनी खान्देशाच्या लोककलेच्या प्रवाहात वहीगायनाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.