जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । वीज चोरी पकडण्याकरिता गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना एरंडोलात घडली आहे. यात एका वीज कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार बसला असून हात फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जमखी कर्मचाऱ्याला येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
एरंडोल येथील वीज कर्मचारी इच्छानंद पाटील व त्यांच्या सोबत कर्मचारी हे जवखेडा खुर्द. येथे विज चोरी पकडण्याकरिता गेले. दरम्यान, मनोज प्रताप पाटील यांच्या शेतातील हुक लावलेली वायर पकडली. मनोज प्रताप पाटील जवखेडा खुर्द या शेतकऱ्याने वीज कर्मचारी अक्षय रमेश महाजन यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. अक्षय महाजन यांच्या डोक्याला मार व हाताला फ्रॅक्चर झाले असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे हलवले असता त्यांच्यावर उपचार करून जळगाव हलविण्यात आले.
वीज वितरण चे कर्मचारी इच्छानंद पाटील, पंकज नारायण येवले, अमोल रमेश रामोशी, अक्षय रमेश महाजन, गजानन शंकर मराठे व इतर कर्मचारी हे जवखेडा खुर्द येथे विज चोरी पकडण्याकरिता हे सर्व कर्मचारी गेले होते. त्यातील अक्षय रमेश महाजन वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी मनोज प्रताप पाटील यांच्या शेतातील त्यांनी अवैध जोडणी केलेली वायर काढली असता मनोज प्रताप पाटील यांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे पोलीस स्टेशनला त्याबाबत महावितरण चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली असून त्याबाबत एरंडोल पो.स्टे. चे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.