खाकी डागाळली! २० हजाराच्या लाच प्रकरणी भुसावळच्या PSI वर गुन्हा दाखल

मे 30, 2026 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. यातच आता भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) भर पडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत ३० हजारांची लाच मागून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

lach jpg webp

राजू सांगळे (बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ) असं पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून सलीम हकीम कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड) असं खाजगी इसमाचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भुसावळातील तक्रारदार व त्याच्या मित्राचे एकासोबत २८ मार्च २०२६ रोजी खडका चौफुली येथे पाच हजार रुपये मागितल्यानंतर वाद झाले व किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर उभयतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताच्या शोधासाठी घरी गेलेल्या उपनिरीक्षकाने संशयीत व तक्रारदाराच्या पत्नीकडे गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ३० हजारांची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने काल २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांनी त्यांचा खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी याच्या माध्यमातून तक्रारदाराशी तडजोड केली आणि लाचेची रक्कम २० हजार रुपये निश्चित केली. ठरल्याप्रमाणे पंटर सलीम याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. लाचेची मागणी करताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंटर सलीम कुरेशी याला जागीच ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ही रक्कम पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांच्या सांगण्यावरूनच मागल्याची कबुली दिली. या निष्पन्नानंतर पथकाने तात्काळ कारवाई करत पीएसआय राजू सांगळे यांनाही अटक केली.

दोघांविरुद् बाजारपेठ पोलीस ठाण्यात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या तक्रारीवरुन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील तसेच अमोल पाटील, भूषण पाटील आदींनी यशस्वी केली.

दरम्यान, कायद्याचे रक्षकच लाच प्रकरणी जाळ्यात अडकत असतील तर सामान्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now