जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । जळगाव शहरातील मार्केटमध्ये तुम्हीही खरेदीसाठी कारने जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. रविवारचा गुढीपाडवा आणि सोमवारच्या रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी व्हायला सुरूवात झाली असून यामुळे वाहतुकीचा खोळंबा सुरू झाल्याने आगामी पाच दिवस शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात सुभाष चौक, टॉवर परिसर, राजकमल टॉकीज परिसरात येणाऱ्या रस्त्यांवर उद्यापासून (२६ मार्च) चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक रस्त्यावर वाहतूक शाखेच्या माध्यमातून बॅरीकेट्स लावण्यात येणार आहेत

जळगावचे तापमान चाळीसपर्यंत पोहचत आल्याने दुपारी ३ ते ५ या वेळेचा अपवाद वगळता सकाळी व रात्री उशिरापर्यंत मार्केट परिसरात खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. अवघ्या पाच दिवसांवर सण आल्याने आता प्रत्येकाकडून खरेदीला जोर दिला जातो आहे. त्यात मुस्लिम बहुल भाग असलेल्या शनिपेठ, बळीरामपेठ, सुभाष चौक, फुले मार्केट, गांधी मार्केटमध्ये खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने रस्त्याच्या दोन्ही बाजुने हॉकर्सने दुकाने लावल्याने रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होत आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खरेदीसाठी गर्दी होत आहे.
वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून नियोजन केले जात आहे. टॉवर चौकातून घाणेकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर टॉवरजवळ, गांधी मार्केट चौक, राजकमल टॉकीजकडून सुभाष चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील बोहरा मशिदीजवळ तसेच चित्रा चौकातून पोलनपेठ मार्गावर बॅरीकेट्स लावले जाणार आहेत.