आकाशवाणी चौकातील सर्कल रद्द करा – राष्ट्रवादीची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । शहरातील महामार्ग असलेल्या आकाशवाणी चौक येथील सर्कल सतत अपघाताचे ठिकाण ठरत असल्याने तेथे नविन उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात व्हावी अन्यथा १५ दिवसानंतर सर्कल तोडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे जिल्हाध्यक्ष (महानगर) अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आली.
मागच्या वर्षी आकाशवाणी चौक येथे सर्कलचे बांधकाम सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर, जळगाव जिल्हा तर्फे याठिकाणी सर्कल न बांधता उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग व्हावा याकरिता सर्कलचे होणारे बांधकाम थांबविण्यात येऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व नॅशनल ऑथोरीटी या सर्व प्रमुख विभागांना व अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन मागणीपत्र सादर केले होते. आपणास भेटल्यानंतर त्याठिकाणी लवकरात लवकर भुयारीमार्ग किंवा उड्डाणपूल बांधण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.
अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या चौकात वाहने व रिक्षा, कालीपिली टॅक्सी, माल वाहतूक वाहने, रेतीचे डंम्पर इ. अनधिकृतपणे उभे रहात असल्याने वाहतुकाला खूपच अडथळा निर्माण होत असतो. तसेच या चौकात कोणतेही स्पिड ब्रेकर नाहीत, सिग्नल व्यवस्था नाही, एका बाजूला बॅरेगेटस तेथील जागा मालकाने लावून ठेवलेले आहे, तसेच तापी पाटबंधारे विभागाची अतिक्रमीत भिंत पाडण्यात न आल्याने त्याठिकाणी रस्ता निमुळता झालेला आहे.
अशा अनेक प्रकारे अनेक अडचणी असल्याने त्याठिकाणी वारंवार अपघात होतच असतात. याकरिता त्याठिकाणी सर्कल तोडून उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग लवकरात लवकर बांधण्यात यावा. या निवेदनाची १५ दिवसात दखल न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महानगर)तर्फे सर्कल तोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रिंकू चौधरी, किरण राजपूत, सुशील शिंदे, अकिल पटेल, राजू मोरे, रमेश वारे, सुनील माळी, सुदाम पाटील, इब्राहिम तडवी आदींचीसह स्वाक्षरी आहे.