Jalgaon : जळगाव महापालिकेतील रिक्त 650 पदे भरली जाणार‎

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२३ । जळगावातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) लवकरच मोठी भरती होण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिका स्थापनेला‎ येत्या मार्च महिन्यात २० वर्षे पूर्ण हाेत असून नगरपालिका असताना राज्य‎ शासनाने वेळाेवेळी काढलेल्या‎ आदेशानुसार रिक्त पदांवर भरती‎ करण्यात आली हाेती. त्यातच महापालिका स्थापनेनंतर प्रथमच‎ मनपाचा २१५७ पदांच्या‎ आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी‎ दिली.

त्यात ८४२ पदे व्यपगत करताना‎ ३३६ नवीन पदांची निर्मिती करण्यात‎ आली आहे. त्यामुळे मनपातील रिक्त‎ ६५० पदांवर भरती करता येणार आहे.‎मनपाच्या स्थापनेपासून आजपर्यंत‎ १०१ पदांची भरती व अनुकंपा नियुक्ती‎ वगळता काेणतीही भरती झालेली‎ नाही. त्यामुळे गेल्या २० वर्षांत सुमारे‎ ११०० कर्मचारी महापालिकेच्या‎ सेवानिवृत्त झालेले आहेत.‎

सध्या १५५० कर्मचारी मनपात‎ कार्यरत आहेत. महापालिकेच्या विविध विभागांवर‎ कमी कर्मचारी असल्याने ताण वाढला आहे. मात्र आता नवीन‎ आकृतिबंध मंजूर झाल्याने नवीन‎ कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न सुटणार‎ आहे.

मनपाकडे २५६१ पदांचीच माहिती‎
मनपाने राज्य शासनाकडे आकृतिबंध मंजुरीसाठी‎ १ नाेव्हेंबर २०२१ व १५ सप्टेंबर २०२२ राेजी प्रस्ताव‎ सादर केले हाेते. त्यानुसार शासनाने मंजूर २६६३‎ पदांच्या नियुक्तीचे आदेश मागवले हाेते; परंतु‎ मनपा केवळ २५६१ पदांचेच आदेश सादर करू‎ शकली. तर १०२ पदांच्या आदेशाची काेणतीही‎ माहिती मनपात उपलब्ध नाही. दरम्यान,‎ आकृतिबंध मंजूर करताना राज्य शासनाने २६६३‎ पैकी ८४२ पदे व्यपगत केली आहेत. यात वर्ग‎ एकचे एक, वर्ग दाेनची तीन पदे, वर्ग ३ची ३२२ पदे‎ तर वर्ग चारची ५१६ पदे व्यपगत केली असल्याचे‎ या आकृतिबंधातून प्रकर्षाने समाेर आले आहे.

३९ विभागांसाठी ३३६ पदांची निर्मिती‎
महापालिकेत आवश्यक नसलेली पदे रद्द करताना‎ शासनाने नवीन पदांची निर्मिती करताना काही पदांची‎ नावे बदलली आहेत. मनपातील विविध ३९ विभागांत‎ १८२१ मंजूर पदे असून ३३६ नवीन पदांची निर्मिती‎ करण्यात आली आहे. यात अतिरिक्त आयुक्त हे पद‎ प्रतिनियुक्तीवर असेल. याशिवाय प्रभाग कार्यालयांत‎ ६७ नवीन पदे तयार हाेतील. ई-प्रशासन विभागासाठी‎ प्रथमच दाेन पदांची निर्मिती करण्यात आली आहे.‎