muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील सुकळी व दुई शिवारात शेतऱ्यांच्या कृषी वीजपंपाच्या केबल चोरीचे सत्र सुरूच असून पुन्हा दि. १७ व १८ रोजी संपूर्ण शिवारातील केबल्स् चोरी गेल्याचा प्रकार घडला. परीसरात वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकरी वर्ग पुर्णत: वैतागला आहे. दरम्यान, या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वजा अपेक्षा शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे मात्र, पोलीस प्रशासनाला कोणताही क्लु अद्यापपर्यत मिळाला नसल्याने शेतकरी बांधवांत नाराजी व्यक्त होतांना दिसून येत आहे.
नवीन केबल बसविण्यास होतो पाच हजार खर्च
वीज स्टार्टर ते बोअरवेल पर्यतची दोन-तिन मीटर केबल्स चोरांनी कापुन नेल्यास त्याजागी नवीन केबल बसवण्यासाठी नवीन केबल, बोअर मधिल मोटार पंप उंचावण्यासाठी लागणारे साहित्य भाडे,गाडी भाडे,मजुरी आणि किरकोळ साहीत्य खर्च असा पाच हजार रुपयांचा खर्च होत असल्याने शिवाय याकामी वेळ जात असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त होऊन वैतागला आहे.ऐन दिवाळी तोंडावर असतांना शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.यामुळे परीसरातील शेतकरी बांधवांची दिवाळी एक प्रकारे अंधारातच जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सतत होणाऱ्या चोरींला शेतकरी तर वैतागलेच पण पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा घटनास्थळी पंचनामे करतांना पुरता वैताग आलेला दिसुन येत असुन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
केबल मधील धातुची तारेला भंगारात मिळतो भाव
कृषी पंपाच्या केबल वायर मध्ये तांबे धातुची तार असते भंगारातही या धातुला किलोमागे सात-आठशे रुपयांचा अपेक्षित असल्याचे समजते.एका बोअरवेलच्या चोरलेल्या केबलमधुन तीन ते पाच किलो पर्यत धातुची तार सहज मिळते. हे
केबल चोर मध्य प्रदेशातील असल्याचा शेतकरी बांधवांचा संशय
शिवारापासुन जंगलातुन अवघ्या चार-पाच कि.मी अंतरावर मध्य प्रदेश ची सीमा आरंभ होते.दुई येथील काही तरुणांना जंगल परीसरात केबलमधील तार काढल्याचे अवशेष आढळुन आले होते.तसेच सागर नामक गुटख्याची खाली पुडी व इंदुरी नामक खर्रा कागद शिवारात झालेल्या चोरीच्या घटनास्थळी दिसुन आले होते.तसेच मागील महिन्यात दुई शिवारातील एका शेतात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता.मात्र आतापर्यत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मृताचे आप्त स्वकीय कुणीही समोर आले नाही. मृत व्यकती कुठली? याबाबत पोलीस प्रशासनाकडुन व शेतकरी बांधवांकडुन प्रयत्नही झाले मात्र ओळख पटली नसल्याने तो मृतदेह चोरट्याच असु शकतो यात शंका नाही.या सर्व गोष्टींचा विचार करता चोरटे मध्य प्रदेशातील असल्याचा संशय जनमानसातुन व्यक्त होत आहे.
ग्राम सुरक्षा दलाची स्थापनेसह रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
या परीसरातील गावात ग्रामसुरक्षा दल व रात्रीची पोलीस गस्तीची मागणी शेतकरी बांधवांकडुन केली जात आहे.