.. म्हणून जामनेरात राष्ट्रवादीने गिरीश महाजनांच्या पुतळ्याचं केले दहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालेली दिसून येत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केला. यावरूनच जामनेर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पुण्यातील एका पुरस्कार वितरण सोहळ्यात गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. महाजन यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांनी एकेरी उल्लेख झाल्याचं निदर्शनास आणून दिले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती.

मात्र आज जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरून मुर्दाबादच्या घोषणा देत मंत्र्यांचा पुतळा जाळला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड म्हणाले की, जनतेच्या मुख्य समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपचे लोक महापुरुषांचा अवमान करण्यात व्यस्त आहेत. या प्रश्नावर मंत्र्याने महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी माविआच्या वतीने आम्ही सर्वांची मागणी आहे. राष्ट्रवादीकडून विलास राजपूत, किशोर पाटील, अरविंद चितोडिया तर काँग्रेसचे शंकर राजपूत, एस.टी. पाटील, रउफ शेख, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर बोरसे, राहुल चव्हाण यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.