श्रावणातही पावसाची उघडीप: जळगावात उकाडा वाढला, आगामी चार दिवस असे राहणार हवामान?

ऑगस्ट 19, 2026 10:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । श्रावण सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून मंगळवारी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ७६ टक्क्यांवर पोहोचले. त्यातच कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसवर गेल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

rain monsoon

पुढील काही दिवसांत तापमानात आणखी १ ते १.५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे. हवेतील वाढलेली आर्द्रता आणि जमिनीतील ओलावा यामुळे वातावरण थंड होण्याऐवजी उकाडा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, १९ ते २२ ऑगस्टदरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज नसल्याने जोरदार पावसासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

यंदा दुष्काळाची ७० टक्के शक्यता?

एल निनोचा प्रभाव वाढत असल्याने यंदाचा मान्सून अपेक्षेप्रमाणे साथ देईल का, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यातच खासगी हवामान संस्था स्कायमेटने मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, यंदा देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ७० टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्कायमेटने एप्रिलमध्ये देशात सरासरीच्या ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, सुधारित अंदाजात पावसाचे प्रमाण आणखी कमी करून ते सरासरीच्या केवळ ८५ टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज

१ जून ते ३१ जुलैदरम्यान देशात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण आणखी घसरून सरासरीच्या सुमारे ८० टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जळगावसह राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाच्या स्थितीकडे लागले आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी मोठ्या पावसाची शक्यता नसल्याने पिकांसाठी पुरेशा पावसाची गरज कायम आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now